“कोणाला काही फरक पडत नाही, आपण खूश आहोत की दुःखी!!”
मधुश्री देशपांडे गानू
“जन पळभर म्हणतील हाय.. हाय..
मी जाता राहील कार्य काय?”
प्रख्यात साहित्यिक भा. रा. तांबे यांची प्रसिद्ध कविता आहे ही. किती समर्पक आहे! कितीही जवळची, प्रेमाची व्यक्ती गेली तरी तुमचं आयुष्य थांबत नाही ना! ते चालूच राहतं. हेच जीवन आहे.. ही चराचर सृष्टी अव्याहत चालूच राहते.
मग आपला आनंद, समाधान हे लोकांवर अवलंबून का असावं? ही आपली जबाबदारी आहे ना! आपण आशेने लोकांकडे का पाहतो?? “लोक काय म्हणतील?” असं काहीही या जगात नसतंच, असे प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे म्हणतात. कारण आपणही लोकच आहोत ना! आणि खरंच कोणाला काहीही फरक पडत नाही तुम्ही खुश आहात की दुःखी!!
तुम्ही सातत्याने समाजाचा, जगाचा, आसपासच्या लोकांचा केंद्रबिंदू असूच शकत नाही. तुम्हाला वाटतं तसा कोणीही सतत तुमचा विचार करत नसतं. प्रत्येकाला स्वतःच्या काळज्या, विवंचना, कामं, प्राधान्यता असतात. कोणाच्याही अगदी तुमच्या जवळच्या प्रेमाच्या व्यक्तीच्या ही तुम्ही 24 तास मनात, विचारांमध्ये नसता. जर अशी तुमची अपेक्षा असेल तर ती अगदीच अवास्तव आणि अमान्य आहे.
तुम्ही सतत असा विचार करत असता की, लोक आपल्या बद्दल काय म्हणत असतील? त्यांचं आपल्या बद्दल काय मत असेल? मी असा वागलो तर ते मला नावं ठेवतील का? ते माझे कौतुक करतील का? तर हा तुमचा दोष आहे. कारण तुम्ही या निरर्थक विचारांना अति महत्त्व देत आहात. यातूनच मानसिक नैराश्य जन्माला येतं.
समाजात, कुटुंबात वावरताना आपली एक प्रतिमा असावी असं प्रत्येकालाच वाटतं, यात चूकही काही नाही. लोकांनी आपलं कौतुक करावं असं प्रत्येकाला वाटणंही चूक नाही. खरंतर कौतुकाच्या दोन शब्दांनी तुम्हाला प्रोत्साहनच मिळते. आणखी चांगलं करण्यासाठी तुम्हांला उत्साह येतो. पण लोकांनी सातत्याने माझ्याकडेच लक्ष दिले पाहिजे, माझंच कौतुक केलं पाहिजे, असा अट्टाहास मात्र चुकीचा आहे.
आपण स्वतः काही समजुती करून घेतलेल्या असतात लोकांविषयी.. आणि तसं घडलं नाही तर मात्र आपण प्रतिक्रिया व्यक्त करतो. चिडतो, रडतो, नाते संबंध तोडून टाकतो. आपण त्या घटनेचा दुसऱ्या बाजूने विचारच करत नाही. कारण आपल्या अपेक्षा अवास्तव असतात.
अगदी साधं उदाहरण घ्या. सध्या सोशल मीडियावर आपण सगळेजण आपले सामाजिक, वैयक्तिक काही प्रसंग असू दे ,आपण पोस्ट करत असतो. आणि मग दिवसभर किती लाईक आले, किती कमेंट आले हे सतत पाहत बसतो. आणि अमक्याने लाईक केलं नाही, तिने मला कमेंट केली नाही असा विचार करून आपण दुःखी होतो.
विशेषत: स्त्रिया सतत फोटो पोस्ट करत असतात. आणि लाईक आणि कमेंट चा हिशोब करून दुःखी होत असतात. लोकांना काय एवढाच उद्योग आहे का?? तुम्ही सतत केंद्रबिंदू कसे राहू शकता?? तुमच्या वैयक्तिक सुखदुःखात लोकांनी किती आणि का Interest घ्यावा?? स्वेच्छेने छान म्हणणं वेगळं आणि लोकांचं आपल्याकडेच लक्ष हवं हा अट्टाहास वेगळा आणि संपूर्णपणे चूक.. आज याच कारणामुळे मानसिक समस्या प्रचंड वाढलेल्या आहेत. तुम्ही सुखी असा नाही तर दुःखी असा तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी लोकांना काय देणे घेणे आहे??
“सर्वात प्रथम “लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात?” हाच विचार तुम्ही सोडून दिला पाहिजे.” तुमच्या बद्दल लोकांची काय मत आहेत याचा सतत विचार करून तुम्ही आनंदी होऊ शकत नाही. लोक काय म्हणतील? हा विचार जेव्हा तुम्ही सोडून देता तेव्हाच तुम्ही तुमचे तुम्हांला सापडता.
जेव्हा तुम्ही तुमच्या अंतर्मनात डोकावता, स्वतःवर जीवापाड प्रेम करता, स्वतःमध्ये प्रगती करण्यासाठी प्रयत्नशील राहता, फक्त स्वतःवर संपूर्ण आणि वास्तविक लक्ष केंद्रित करता तेंव्हाच तुमचा सर्वांगीण विकास होत राहतो. आणि तुमच्या असं लक्षात येतं की तुमचं स्वतःला अधिकाधिक प्रगतिशील बनवणं याकडे आपसूकच लोक आकर्षिले जातात. आणि सहाजिकच तुमचं मनापासून कौतुकही करतात.
कोणतीही छोटी किंवा मोठी गोष्ट करताना कोणालातरी दाखवायचं आहे, स्वतःला सिद्ध करायचं आहे, कोणाला तरी कमी लेखायचं आहे यासाठी अजिबात करू नका. तर त्यातून तुम्हाला पूर्ण आनंद आणि समाधान मिळतंय ना हे पहा.
आता नवरात्र चालू आहे. स्त्री शक्तीचा जागर सर्वत्र होत आहे. पण बहुतेक स्त्रिया मात्र मी अमकीपेक्षा सुंदर कशी दिसेन? मेरी साडी उसकी साडी से सुंदर चाहिये.. यातच अडकलेल्या दिसतात. हा तुमच्या विचारांचा दोष आहे. कोणालाही याची फिकीर नसते. तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी नटलात तर तुम्ही जास्त खुलून दिसता. एखाद्याबद्दल मनात असूया, मत्सर बाळगला तर त्याचा त्रास फक्त आणि फक्त तुम्हांलाच होतो. समोरचा मात्र स्वतःच्या आयुष्यात मस्त असतो.
तुमची प्रेमाची माणसं, जवळचे मित्र-मैत्रिणी यांना नक्कीच तुमच्या आयुष्यातील बऱ्या-वाईट प्रसंगांनी फरक पडतो. त्यांना तुमची खरी काळजी असते. पण तरीही कोणतंही नातं गृहीत धरू नये. कोणत्याही गैरसमजामुळे नातं तोडू नये. माझ्या वर सर्वांनी प्रेम केलेलं, माझं कौतुक केलेलं मला आवडेल, ही ईच्छा छानच आहे. पण यासाठीचा अट्टहास चुकीचा आहे.
तुमच्या जवळची, प्रेमाची व्यक्ती असली तरीही, प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा असा प्रवास, संघर्ष असतो. कामाची, नात्यांची प्राधान्यता वेगळी असते. त्यामुळे तुम्ही आनंदी असा की दुःखी असा, प्रत्येक वेळी ते बरोबर असतीलच असे नाही. प्रत्येक जण आपापल्या विश्वात मग्न असतो. आजच्या स्पर्धात्मक युगात तर खरंच कोणालाही वेळ नसतो. आणि कोणालाही फरकही पडत नाही.
लोक काय म्हणतील? याचा अती विचार करून तुम्ही स्वतःचा आनंद, आत्ताचा बहुमोल क्षण गमावू नका. तुमचा आनंद तुमच्यातच सामावलेला आहे. बाह्य गोष्टींवर, लोकांवर तो अवलंबून नाही. स्वतःसाठी कायम प्रयत्नशील राहा. तुम्ही आनंदी असा किंवा दुःखी दोन्हीला यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी स्वतःला अधिक सक्षम, सामर्थ्यवान बनवा..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



खूप सुंदर लेख