“उपकाराची भाषा सतत गिरवणाऱ्या लोकांकडून पुन्हा कुठलेही उपकार स्वीकारू नका.”
मधुश्री देशपांडे गानू
माणूस समाजप्रिय प्राणी आहे. त्याला सतत माणसांचा गोतावळा आजूबाजूला लागतो. म्हणून तर कुटुंब व्यवस्था, लग्न संस्था अस्तित्वात आल्या आणि आजही टिकून आहेत. कुटुंबीय, नातेवाईक, शेजारी-पाजारी, सहकारी, मित्र मैत्रिणी अशी सगळी त्याची स्वतःची हक्काची माणसे प्रत्येक व्यक्तीला हवीहवीशी असतात.
आपल्या सुखदुःखात सहभागी होणारी, आपल्याला समजून घेणारी, आपल्या यशात आनंद मानणारी, आपलं मन मोकळं कौतुक करणारी, आपण चुकलो तर चार समजुतीच्या गोष्टी सांगणारी, मनमोकळ्या गप्पा मारायला आपली अशी माणसं गरजेची असतात प्रत्येकाला..
खूपदा प्रेमाची नाती असूनही नातलग लांब असतात. अशा वेळी तर शेजारीपाजारी यांचा सहवास खूपच महत्त्वाचा असतो. वेळप्रसंगी हीच माणसं सर्वात आधी धावून येतात. आयुष्याच्या प्रवासात अनेक आनंदी, दुःखी क्षणांना, प्रसंगांना प्रत्येक व्यक्ती सामोरी जात असते. अशावेळी आनंद वाटून घेणारे, धीर देणारे सहप्रवासी हवेच असतात..
कितीतरी दुःखद प्रसंग अकस्मात अचानक समोर उभे राहतात. आपण गोंधळून जातो. काय करावे सुचत नाही. आपली मानसिक, शारीरिक, आर्थिक कोणत्याही स्वरूपाची तयारी नसते. अशा वेळी कोणीतरी आपल्याला आधार देण्याची, सर्वतोपरी मदत करण्याची गरज असते. आपण परमेश्वराचा धावा करतो. पण परमेश्वरही कोणत्यातरी माणसाच्या स्वरूपातच येऊन मदत करून जातो ना!
आता कोविड काळात तर हे सर्व आपण प्रचंड स्वरूपात अनुभवत आहोत. किती घरातील कर्ते पुरुष या महामारीला बळी पडले आहेत. त्यांच्या अर्धांगिनींना पतीच्या आर्थिक व्यवहारांची माहिती नाही. बाहेरचे व्यवहार येत नाहीत. आणि एकुलतं एक कमावणारं माणूसच नाही म्हटल्यावर आता भविष्यात काय? हा प्रश्नही नव्याने आ वासून उभा राहिला आहे. अशा कितीतरी स्त्रियांना आज मानसिक आधाराची, समजून घेण्याची, समुपदेशनाची गरज आहे. त्यांची कौटुंबिक, आर्थिक घडी पुन्हा नव्याने बसवून देण्याची गरज आहे. अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. पण हेच मदतीचे हात जर सतत उपकाराची भाषा बोलू लागले तर ???
आपली वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात की “जर एका हाताने कोणाला मदत केली तर ती दुसऱ्या हातालाही कळता कामा नये.” आपण एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केली आणि तिच्या आयुष्यात ती व्यक्ती पुन्हा समर्थपणे उभी राहिली तर ही आनंदाची, समाधानाची गोष्ट आहे. पण जर तुम्ही या मदतीचा सारखा उल्लेख करत असाल, सतत जाणीव करून देत असाल की “बघ, त्यावेळी मी मदत केली म्हणून तुला आज हे दिवस दिसतात.” तर अशा वेळी त्या व्यक्तीला त्याचा मानसिक त्रास होऊ शकतो. जरी तुम्हीं त्या प्रसंगापुरती मदत केली असली तरी, त्या प्रसंगाला धीराने तोंड देणे, त्यातून बाहेर पडणे, स्वतःच्या हिमतीने पुन्हा उभं राहणं हा प्रवास तर त्या व्यक्तीचा स्वतःचाच असतो. तुम्ही निमित्तमात्र असता.
पण बर्याच लोकांना हे कळत नाही. स्वतःबद्दल बढाया मारणे, फुशारक्या मारणे, आत्मस्तुती करणे ही सवय असते त्यांची. स्वतःचा अहंकार कुरवाळणे हा आवडता उद्योग. सतत लोकांना “मी कशी अमक्याला मदत केली, तमक्याचं कसं माझ्यामुळेच सुरळीत चालू आहे..” याची टिमकी वाजवत असतात. तुम्ही ज्यांच्यावर उपकार केलेले असतात ते एक तर तुमच्या मदतीमुळे दबून गेलेले असतात. परतफेड करायची इच्छा असते त्यांना आणि करतातही.
पण तुमच्या अशा सततच्या उपकाराच्या भाषेमुळे त्यांना अपराधी वाटू लागतं. आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असते. स्वतःबद्दल कमीपणाची भावना निर्माण होते. आणि याचा अतिरेक झाला तर तुमच्याविषयी घृणा, संताप वाटू शकतो. अनेक घरांमध्ये कुटुंबप्रमुखाची अशी भाषा असते “माझं घर आहे. माझ्या घरात तुम्ही रहात आहात.” कुटुंबातील सदस्यांना सतत आपण यांच्या घरात राहतोय म्हणजे हे आपल्यावर उपकार करतात अशी जाणीव ते करून देत असतात.
खरं म्हणजे आपली सगळी नाती छान, निकोप रहावीत यासाठी आपण कोणाचीही मदत न घेणे हे तर सर्वात श्रेयस्कर. कोणालाही आपण दुसऱ्याच्या उपकाराखाली दबून राहू अशी इच्छा नसते. पण कोणावर कशी परिस्थिती कधी ओढवेल हे सांगता येत नाही. आज आपण एखाद्यावर उपकार केले तर बोलून दाखवतो. पण हीच वेळ उद्या आपल्यावरही येऊ शकते, याचे भान आणि जाणीव प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे.
आज सोशल मीडियावर ही अनेक समाज कार्य करणारे खरंच समाजकार्य कमी आणि फोटोंना विषय म्हणून करत असतात. जे खरंच समाजसेवा करतात, ते याचा उल्लेखही करत नाहीत.
आपण या सगळ्यातून हाच बोध घ्यायचा की कधीतरी आपल्याला कोणाचीतरी कोणत्याही स्वरूपाची मदत लागते, लागू शकते. आणि आर्थिक असेल तर जमेल तशी लवकरात लवकर परतफेड करावीच. खरंतर गरजूंना मदत करणे, भुकेलेल्यांना अन्न खाऊ घालणे, कोणत्याही स्वरूपाचा मदतीचा हात देणे ही आपली संस्कृती आहे. याला “उपकार” हा फारच मदत घेणाऱ्या व्यक्तीचा स्वाभिमान दुखावणारा शब्द आहे. पण उपकाराची सतत भाषा करणाऱ्या व्यक्तीकडून मात्र पुन्हा मदत घेण्याची चूक करू नका.
तुम्हीं तुमच्या आयुष्यात जरूर तुमच्या क्षमतेप्रमाणे गरजूंना मदत करा.पण याची जाहिरात करू नका.. वाच्यता करू नका. वाटाड्या वाट चुकलेल्या प्रवाशांना वाट दाखवतो ना! प्रवाशांना त्यांचा प्रवास त्यांनाच करायचा असतो. तसे वाटाड्या व्हा. “आकर्षणाचा सिद्धांत” माहित आहेच. तुम्ही निर्मळ, चांगल्या मनाने एखाद्या गरजूला केलेली मदत तुम्हांला समाधान देऊन जाते. आणि त्याची नोंदही होते. मग आपल्याही गरजेला कोणी निर्मळ मनाचा आपल्या पाठीशी उभा राहतोच.. हो ना!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


