Skip to content

आयुष्यात एकदातरी ठेच लागलीच पाहिजे.

आयुष्यात एकदातरी ठेच लागलीच पाहिजे.


टीम आपले मानसशास्त्र


आयुष्यात एकदातरी ठेच लागली च पाहिजे. का ? तर आपल्याला त्यातून शिकायला मिळते . काय बरोबर , काय चूक हे समजते. आयुष्याचे धडे गिरविले जातात.

लहान असताना गरम दूध पिताना तोंड भाजते. चटका बसतो. म्हणून पुढच्या वेळी आपण थंड ताक ही जे दुधासारखे पांढरे दिसते . तेही आपण फुंकून पितो. कारण काय तर पहिल्या वेळेचा आलेला वाईट अनुभव. चटका परत पुढच्या वेळेस बसू नये म्हणूनच तर ना!!

आयुष्यातली ठेच म्हणजे तरी काय अनुभवच ना ! आयुष्यातला सगळ्यात मोठा गुरू ठेच आहे. ठेच खात जाल तसे शिकत जाल. शाळेत असताना आपली मैत्री एखादा मित्र किंवा मैत्रीण यांच्या सोबत होते आपल्याला वाटते हा किंवा ती हेच आपले बेस्ट friends आता कोणाची गरज नाही. पण जेव्हा आपण आपले बेस्ट friends मानणारे मित्र मैत्रिणी नवीन friends करतात आणि आपल्याकडे दुर्लक्ष करतात तेव्हा आपल्याला त्रास होतो.

त्यातून आपण काय शिकतो की कोणीच कायमस्वरूपी आपल्या सोबत राहणारे नाहीत. त्यामुळे खूप जवळीक एखदायशी करून बाकी लोकांकडे ..friends कडे दुर्लक्ष करू नये. सगळ्यांना सारखेच महत्व द्यावे. सगळ्यांशी बोलावे. मदत घ्यावी करावी पण थोडे अंतर ठेवून ..खूप जवळीक कोणा एकाशी करू नये. तसे केले तर त्रास च अधिक.

शिक्षणात जे विषय कच्चे आहेत त्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर विषय कच्चे तर राहतात पण failure येते. अशावेळी निराश होवू नका. तर या अनुभवातून सकारात्मक विचार करून काही ध्येय निश्चित करा. जसे की कोणता विषय जमत नाही , अभ्यास कसा केला तर सोपा जाईल, टाईम टेबल बनवा. गरज असेल तर क्लास लावावा. मार्गदर्शन घ्यावें. शिक्षकांना मोकळेपणाने शंका विचारणा करावी. आत्मविश्वास वाढवून मला हे जमणार असे प्रयत्न करा.

काही वेळेस विषय कच्चा राहिल्याने अपयश आलेले असते त्यातून निराशा ही येते. अशावेळी हाच शेवट नाही हे लक्षात घ्यावे . दहावी पर्यंत सगळे विषय compulsory आहेत. पण त्यानंतर तुमच्या हातात तुमचे विषय निवड आहे. हे लक्षात घेवून आपल्याला हे दहावी पर्यंतच्या विषयाचा अभ्यास नेटाने करणे गरजेचे आहे हे लक्षात घेवून अभ्यास आणि त्याची पद्धती ठरवून घेतली पाहिजे.

दहावी नंतर ही विषय निवडले आपल्या इच्छेने तरी काही वेळेस अवघड जातं. आणि मग निराशा येते , काही विद्यार्थी तर अगदी sucide कडे वळतात. आता सगळे संपले हेच असते मनात. तसे करू नका. शांत रहा. एखादे वर्ष मागे पडलो तरी काही बिघडत नाही. विषय अवघड जात असतील प्रयत्न करा. त्यातून नाही जमले तर विषय परत बदला. पण त्याकरिता सुंदर आयुष्य संपवू नका. निराश . हताश होवू नका.
आयुष्यातले हे अनुभव , या ठेचा आपल्याला पुढे जाण्यास मदत करतात.

नाते संबंध असतील , प्रेम असेल , रिलेशनशिप असेल यात प्रत्येक वेळी आपल्या मनासारखे घडणार नाही. समोरच्याची ही काही इच्छा , अपेक्षा असते. त्याप्रमाणे ही कधी वागावे लागते. म्हणजे काय तर पटले नाही , भांडलो म्हणजे तिथेच विषय संपले. मला गरज नाही. असे म्हणून चालत नाही. कारण आयुष्यात जवळची माणसे फार कमी असतात. आणि कुठे ना कुठे त्यांचे स्वभाव , विचार , आवडी निवडी, गरज , कर्तव्य लक्षात घेणे गरजेचे असते. कायम आपल्याच अपेक्षा आणि त्याप्रमाणे त्यांनी वागले तर ते चांगले , नाही तर ते वाईट असे शिक्कामोर्तब करणे चुकीचे. अशावेळी एक rule कायम लक्षात ठेवा.
” Don’t expect and accept. ”

आपली व्यक्ती जर आपल्याला कायमची पाहिजे असेल तर ती जशी आहे तसा तिचा स्वीकार करा. तिच्यावर विश्वास ठेवा , आदर / respect करा. तिला तिच्या भावना , विचार यांची कदर करा, समजून घ्या.

बघा तुम्हाला अनुभव येईल की हे जे नात्यातले चढ उतार तुम्हाला कधी निराशा ही देतील , तेव्हा सगळ्यांपासून अलिप्त व्हावे वाटेल. पण आपण सामाजिक प्राणी आहोत त्यामुळे कुठे ना कुठे आपल्याला कोणाची गरज असतेच. आपला आनंद , दुःख शेअर करणे असेल , आपण achieve केलेले यश आपल्या लोकांसोबत शेअर करून कधी तरी कौतुकाची थाप मिळविण्यासाठी. तर कधी दुःखात आपल्याच लोकांचा खांदा आपल्याला आधार मिळविण्यासाठी. असे म्हणतात इतरांसोबत शेअर केल्याने मन हलके होते.

कधी कधी आपल्या छोट्या यशाने आपण हुरळून जातो. हवेत जातो तेव्हा आपल्याला जमिनीवर आणण्याकरिता आपले लोक मदत करतात. कारण आपल्या पेक्षा कित्येक लोकांनी खूप काही कमविले असते. कष्ट काढले असतात. याची जाणीव आपलेच लोक टिके मधून करून देतात ..काही वेळेस अजून असे केले तर अशा सूचना , त्यात काय एवढे मोठे केले म्हणजे खरे तर निराश होवू नये तर अजून काही करण्याची संधी आहे. प्रगती करण्या करिता वाव आहे .. तसे प्रयत्न करावे आणि अजून पुढे जावे हाच चांगला हेतू असतो आणि यातून आपल्याला ते motivate करत असतात.

फक्त आपल्याला समजत नसते की समोरची व्यक्ती अशी का वागते ? जरी तुमच्या भल्याचा विचार करून, आयुष्यात पुढे अजून चांगले घडावे म्हणून ती पुढचे निर्णय घेत असेल तरी त्याक्षणी तुमच्या डोळ्यावर पट्टी असते. आणि त्याक्षणी आपण त्या व्यक्तीस दोषी ठरवत असतो. पण ज्या व्यक्तीला माहिती आहे की मी वाईट ठरलो तरी त्यातून समोरच्याचे भले होणार आहे तर ती या बारीक सारीक गोष्टी मध्ये अडकून बसत नाही.

Freshers नावाची मराठी सीरियल होती . त्यात कॉलेज मधले जीवन , हॉस्टेल लाईफ दाखविले. त्यात एका रूम मध्ये वेगवेगळ्या गावातून आलेल्या मुली राहत असतात. लातूर ची जी मुलगी दाखविली ती मोठ्या घरातली , तिचे घराणे राजकीय क्षेत्रातले दाखविलेले .त्यामुळे मी काही करू शकते. ही भावना . आणि नाशिक ची जी मुलगी दाखविली ती गरीब घरातली. घरची जबाबदारी असलेली. घरी आई , लहान भावु आणि ही मोठी. ही नोकरी करून शिक्षण घेत असलेली. आयुष्यात अनेक टक्के टोणपे खात पुढे जाणारी. आयुष्य खूप जवळून बघितलेली. ठेचा खात पुढे जाणारी.

लातूर वाली ला काही सांगितले की आडवे लावणारी. एखादी गोष्ट गोडी ने कर सांगितले की मी का करू , जमणार नाही असेच ,
नाशिक वाली हुशार समजून जाते. प्रत्येकवेळी तिला डिवचत असते, टोमणे मारत असते अरे लातूर तुला हे जमणार च नाही. तेव्हा लातूर वाली मला जमणार च बघच तू असे म्हणून जिद्दीने ते पूर्ण करत असते. आणि मी करून दाखविले हा तोरा असतो. आणि तू कशी हरली नाशिक असे.

पण नाशिक वाली ला काही फरक पडत नाही याचा तिचे ध्येय साध्य झाले असतें आपल्या मैत्रिणी मध्ये प्रेरणा जागी करून तिने ते काम पूर्ण करण्यास प्रोत्साहन दिलेले असतें त्यातून तिला मोठेपणा नको असतो तर आपली मैत्रीण सुधारावी , तिची प्रगती व्हावी हाच हेतू असतो. आणि तो तिला कटूपणा मिळून साध्य झाला तरी तिला फरक पडत नाही.

आयुष्यात असे अनेक अनुभव आपण घेत असतो. माणसाचा मेंदू खूप जटिल आहे तसे मन ही. त्यामुळे एखाद्या वेळेस एखाद्या अनुभवामुळे ठोस मत बनवू नका. अर्थात सतत तेच तेच अनुभव येत गेले तर मात्र अलिप्त व्हा.

एक जोहरी असतो. त्याचे मूल्यवान हिरे घेवून तो दुसऱ्या देशात विकण्याकरिता प्रवास सुरू करतो. तीन दिवसांचा बोटी चा प्रवास. एक चोर असतो त्याचे लक्ष असते या जोहरी कडे. तो विचार करतो रात्री जोहरी झोपला की आपण हिरे चोरू. पहिल्या रात्री तो चोर झोपेचे सोंग घेवू असे ठरवितो आणि त्याला खरेच झोप लागते.

परंतु जोहरी मात्र हुशार असतो. आणि आधीच्या खाल्लेल्या ठेचा यातून जागा राहतो. पण त्याला ही झोप येवू लागते. आणि त्याच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते. हा चोर त्याच्या वर पाळत ठेवून आहे. झोप लागली तर हिरे चोरीला जातील म्हणून जोहरी ते हिरे घेवून त्या चोराच्या खिशात लपवितो आणि गाढ झोपतो. मध्यरात्री चोराला जाग आल्यावर तो हिरे शोधतो .सगळ्या जागा शोधतो त्याला सापडत नाहीत. परत जावून झोपतो. दुसरे रात्री शोधू असे विचार करून झोपतो. दुसऱ्या रात्री ही असेच होते. तिसऱ्या रात्री ही असेच होते. चौथा दिवस उजाडतो प्रवास संपतो. सगळे आपले आपले सामान घेवून उतरत असतात. हा जोहरी ही आनंदाने उतरतो. तेव्हा न राहवून हा चोर , ठग त्या जोहरी ला येवून प्रामाणिकपणे सांगतो की मी चोर असून तीन रात्री मी तुमचे हिरे चोरण्याचा प्रयत्न केला परंतु मला हिरे सापडले नाहीत . पण आता तरी सांगा कुठे लपवून ठेवले होते तुम्ही. ??

तेव्हा जोहरी म्हणतो इतके वर्षात लोकांनी मला चोरले , लुबाडले हे अनुभव या ठेचा लक्षात घेवून मी हळूहळू माझ्यात सुधारणा केल्या. मी माझी नजर तयार केली . की एका नजरेत माझ्या लक्षात येते की कोणाचा काय उद्देश असेल. बोटीत चढलो तेव्हा तू पूर्ण वेळ माझ्याकडे बघत होतास. माझ्या बारीक सारीक हालचाली टिपत होतास . हे लक्षात आले. त्यामुळे रात्री तू झोपल्यावर तुझ्याच खिशात हिरे ठेवत होतो जेणेकरून ते सुरक्षित राहतील .

आयुष्यातली ठेच माणसाला कसे जगायचे हे शिकवत असते.

पळण्याच्या शर्यतीत धावता धावता खेळाडू ठेच लागून पडतो , हरतो , म्हणून निराश होत नाही. परत नवीन जोमाने उठतो आणि सावधानतेने पळत असतो. मग पुढे योग्य shoes घालून पळतो. पण पुढे प्रयत्न करणे सोडून देत नाही.

तसेच आहे .आयुष्य सुंदर आहे.आयुष्यात एकदातरी ठेच लागलीच पाहिजे.तरच आपल्याला आयुष्यातल्या अनुभवातून , लागणाऱ्या ठेचेतून गुरू आणि गुरुमंत्र ही मिळतो आणि आपण कायम नवीन गोष्टी स्वीकारतो आणि शिकतो ही. आणि स्वतः मध्ये positive बदल घडवून आणतो.

आयुष्य सुंदर आहे पुढे जात असताना ठेच लागणार. स्पीड ब्रेकर येणार, घराचा उंबरठा ओलांडताना दुर्लक्ष झाले तर ठेच लागते तसे होणारच .. म्हणून आयुष्य सजग होवून जगा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगा. दुःख , त्रास , धोके अशा अडथळा शर्यत पार पाडत जातानाच आनंद , सुख , समाधान , शांती आणि नात्यातली आपली माणसे ही. आयुष्यातले जगण्याचे अनुभव , प्रगती चे मार्ग मिळत जातात.

खूप जोरात ठेच लागली तर थोडा विसावा घ्या परत नव्या जोमाने उठा. आणि ठेच लागलीच पाहिजे नाही तर आपला भ्रमाचा भोपळा मोठा होत जातो..फुगत जातो. तो कधी तरी फुटून सत्याची जाणीव होणे ही गरजेचे असते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!