Skip to content

आपल्यातली अवास्तव लाज आपलं जगणं कठीण करत असते.

आपल्यातली अवास्तव लाज आपलं जगणं कठीण करत असते.


हर्षदा पिंपळे


लाजून हासणे तुझे…अन् हासून लाजणे तुझे…यातील लाजणं वेगळं आणि लाज वेगळी.लाज म्हणजे अर्थातच लज्जा , शरम होय. अर्थ जरी एक असला तरी प्रत्येक ठिकाणी त्याचा अर्थ मात्र वेगवेगळा असतो. आता प्रेमात असताना अनेकदा लाजेने गाल लाल होतात.त्या गोंडस भावना आतल्या आत फुलपाखरासारख्या भिरभिरत असतात.

त्यांना त्यांचे त्या त्या व्यक्तीप्रती असलेले भाव काहीही केल्या लपवता येत नाहीत. डोळ्यातल्या त्या चोरणाऱ्या नजरेतुन , स्मितहास्यातून ते लाजणं सहज दिसतं.आता हे झालं लाजणं….पण मग “मला लाज वाटते , तुला काही लाजच नाही , थोडी फारही शरम वाटत नाही , काही लाज – लज्जा – शरम सगळं सोडून दिलं वाटतं….” यातील जी लाज आहे ती त्या लाजण्याहून कितीतरी पटीने अधिक वेगळी आहे. “लाज गाली आली…आणि तोंड दाखवायचीही लाज वाटते ”

या दोन्ही वाक्यांमध्ये असणाऱ्या लाज या शब्दाचा अर्थ अगदी भिन्न आहे.लाज गाली आली…यातील लाज म्हणजे काय तर ती चांगल्या भावनेशी निगडीत आहे.आणि दुसऱ्या वाक्यातील लाज ही अगदी त्याच्या विरुद्ध आहे. तोंड दाखवायची लाज वाटते म्हणजे काय तर एखादं वाईट कृत्य आपल्या हातून घडतं , किंवा आपण करतो तेव्हा जगाला तोंड दाखवताना जी भावना मनात येते ती ही लाज.हेही आपण ऐकलं असेलच की , मी नाही जा , मला लाज वाटते. मी कसं करू हे ? मला कसतरी वाटतं , लाज वाटते वगैरे वगैरे.

तर यातील लाज ही सुद्धा वरच्या दोन्ही अर्थांपेक्षा भिन्न आहे.ही भावना काहीतरी वेगळीच असते.म्हणजे कसं होतं याबाबतीत तर एखादी गोष्ट करता येत असते , करायची इच्छा असते पण “मला लाज वाटते” या एका वाक्यामुळे ती गोष्ट जमत असूनही आपण करायची टाळतो. म्हणजेच हीच लाज खरतरं आपलं जगणं कुठे ना कुठे कठीण करत असते.

या अशा अवास्तव लाजेमुळे आपण कितीतरी गोष्टी गमावून बसतो. आणि इतकच नाही तर एकदा गमावून आपण पुन्हा तीच चूक करतो. ‘मला लाज वाटते’ या एका वाक्याला इतके बळी पडतो की काही विचारायला नको.इतकी काय ताकद आहे या लाजेमध्ये ? की ती वाटण्याने गोष्टी अपूर्ण राहतात , आपण त्या गोष्टी स्वतःहून करत नाहीत , क्षमता असूनही आपण सरळ सरळ केवळ त्या लाजेमुळे एखादी गोष्ट नाकारतो.क्षणात नकार देतो आपण…”मला लाज वाटते , मी नाही…” असं हसत हसत म्हणून जातो.

पण हे नेहमीचच होऊन जातं.त्या अशा लाजेपायी कधी कधी तर जगणं आपल्या कळत नकळतपणे असह्य होऊन जातं.आणि आपल्याला त्याचा थांगपत्ताही लागत नाही.लाज कशाची बाळगावी आणि कशाची नाही हे प्रत्येक व्यक्तीला समजायला हवं.अनेकदा कशाची लाज बाळगावी नी कशाची नाही हेच आपल्याला कळत नाही. कुणाला गरिबीची लाज वाटते , तर कुणाला गरिबांची लाज वाटते तर कुणाला माणसं माणसाशी हिनपणाने वागतात त्याची लाज वाटते. तर कुणाला छोटी कामं करण्याची लाज वाटते. खरचं कुणाला कशाची लाज वाटेल काही सांगता येत नाही.

गरिबीची लाज वाटून घेण्यात काही अर्थ नाही. आहे ती परिस्थिती स्विकारण्याची आणि ति परिस्थिती स्विकारून काहीतरी चांगलं करण्याची धमक आपल्यात अशा लाजेने कधीच निर्माण होणार नाही. गरिब असलो म्हणून काय झालं…? आपण माणसच आहोत , कधी ना कधी ही परिस्थिती बदलेल हा विश्वास ठेवून जगलं पाहिजे. गरिबिची लाज वाटून घेण्यात काही अर्थ नाही.कुणीतरी गरीब आहे म्हणून त्यांना हिनवू नये.ते गरीब आहेत तर यात लाज काय वाटून घ्यायची..?

इथे प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळ आहे. किती गरीब आहात तुम्ही , इइइ…आमच असं नाही , तसं नाही… , खरच shame on you….असं म्हणून इतरांना असा तुच्छ लेखण्याचा अधिकार कुणालाही नाही. कोणतही (चांगल) काम हे छोटं किंवा मोठं नसतं.काम हे काम असतं.झाडू मारण्यात कसली आली आहे लाज…?? सफाई कामगार म्हणजे काही कमी नाही… यात कधी कधी तर जो अशी कामं करतोय त्याला त्याच्या कामाची लाज वाटत नसते पण जगात काही वाईट वृत्ती असते हे आपण सगळेच जाणतो.

अशीच वाईट वृत्ती मात्र तुम्हाला तुमच्या कामाची लाज नाही वाटत का..कसं काम करताय हे असं बोलून त्यांच्या जगण्याचा आधार असलेल्या कामाला ते कमी लेखतात.त्यांच जगणं कठीण करतात. मग कधी कधी अशा माणसांना स्वतःचीच लाज वाटायला लागते. आपण किती कमी आहोत वगैरे असं वाटायला लागतं. ती अवास्तव लाज जगणं बेचिराख करून टाकते.

इतकच नाही तर असं कोणतही काम करू नका की ज्याने जगाला तोंड दाखवताना लाज वाटेल.रात्री झोपताना आपलाच चेहरा आरशात पाहताना स्वतःची लाज वाटेल.आपल्या गरिबीची , छोट्या कामाची लाज वाटून घेऊ नका.क्षमता असूनही लाज वाटते या भावनेने गोष्टी नाकारू नका.कारण लाज कोणतीही असुद्या तिने जगणं असह्य़ होतं.आपल्यामुळे दुसऱ्याचही…स्वतःचही…!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!